नाना पटोलेंना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलणाऱ्या पटोलेंना नागपुरात मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे,” अशी टीका बनवकुळे यांनी केली आहे.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा ‘ वध‘ असा उल्लेख करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या बुरसटलेल्या मानसिकतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून दिला आहे. ‘वध‘ राक्षसांचा होतो, महापुरुषांचा नाही, हे या ‘अनपढ ‘ माणसाला कोण सांगणार?”

“नाना पटोले यांना मी अगोदरच सांगितले आहे की, त्यांना नागपूरमधील मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे. बीडच्या कार्यकर्त्यांनी पटोलेंची मानसिक मनस्थिती बिघडली असल्यामुळे त्यांना औषधेही पाठवली आहेत. पटोले हे जाणीवपूर्वक वादग्रस्त अशा प्रकारची वाक्ये काढून काँग्रेसची प्रतिष्ठा मलीन करत आहेत,” असे बावनकुळे यांनी म्हंटले.