हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना आव्हान देणारी तीन कृषी विधेयक ठाकरे सरकार कडून विधानसभेत मांडली. या विधेयकावर चर्चा करताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारच्या सडकून टीका केली. शेतकरी हे गेल्या आठ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. ते दुश्मन आहेत का, ते पाकिस्तानातून आले आहेत का?,” असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
कायदे करताना विरोध होतो, त्यावेळी लोकांना काय हवंय ते लक्षात घेतो; कायदे मागे घेतो. पण इथे बोलायला लागले की ईडीची विडी शिलगावतात. कारण कायदेच तसे आहेत. काहीही आरोप करायचे. आरोप सिद्ध करणारा कुठे तर तुरुंगात, कसे आरोप सिद्ध करायचे? ही लोकशाही आहे. किती वेळ लागेल शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना घरी पाठवायला, असेही भुजबळ म्हणाले.
भुजबळ म्हणाले, या देशात खायला अन्न नव्हतं. ते मी पाहिलेलं आहे. अमेरिकेतून येणारा लाल गहू पाहिला, खाल्ला. स्व. वसंतराव नाईकांनी घोषणा केली. त्यांनी कृषी क्रांती आणली. ती यूपीए सरकारपर्यंत सुरू राहिली. हमीभाव दुप्पट-तिप्पट वाढवून दिले. शेतकऱ्यांनी इतकं पिकवलं की, सव्वाशे कोटी देशवासीयांची भूक भागवून २५ देशांच्या अन्नाची गरज या देशाने भागवली,” असं भुजबळ म्हणाले.