हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असून आपली जबाबदारी झटकत आहेत. कोण म्हणतंय राज्याची जबाबदारी आहे तर कोण म्हणतंय ही केंद्राची जबाबदारी आहे परंतु मराठा समाजाला याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. तुम्ही फक्त मार्ग सांगा हीच मराठा समाजाची मागणी आहे असे म्हणत मराठा समाजाची दिशाभूल कराल तर हा संभाजी महाराज आडवा येईल, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे.
मला कुणी शिकवण्याची गरज नाही . मी छत्रपती घराण्याचा वंशज आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो. समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी आणि समाजाला दिशा देण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे म्हणून मला कोणी शिकवायची गरज नाही. ही वेळ आक्रमक होण्याची नाही. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण असा सवाल करत 27 तारखेला तुम्हाला सर्वाना मराठा समाजाची खरी भूमिका दिसेल असा इशारा त्यांनी दिला.
माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन मी 27 तारखेला माझी भूमिका मांडेन. एकदा मी पाय पुढे टाकला की मागे घेणार नाही. मी 27 तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करणार आहे. या सगळ्यानंतर मी माझी भूमिका मांडेन तेव्हा मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.