हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याबाबत आपली भूमिका मांडली. त्यानंतर मंत्रिमंडळात महिला नेत्या असण्याबाबत चर्चा सुरु झाली. आता शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्यांदा विस्तार होणार असल्याने या मंत्रिमंडळ विस्तारावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याच्या मंत्रिमंडळात किमान 3-4 महिलांना संधी दिली पाहिजे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज सोलापुरात दौऱ्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, राज्य मंत्रिमंडळात तीन ते चार महिलांना सरकारने संधी दिली पाहिजे.आमच्याकडे कॅलिबर महिला आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात 100 टक्के महिलांना संधी द्यावी. मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे मला माहीत नाही. हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे.
तसे पाहिले तर आपल्याकडे प्रामुख्याने महिलांकडे महिला बालकल्याण विभागाचे खाते दिले जाते. पहिल्यांदाच पुरुषाला महिला बाल कल्याण खाते देण्यात आले आले आहे. महिलांनी राजकारणात येताना फक्त तिकीट घेऊन जमत नाही. निवडून आले पाहिजे. इलेक्ट्रोल मेरीट लागते. सक्षम असलेल्या महिलेला संधी दिली पाहिजे. पण केवळ महिला आहे म्हणून मला संधी द्या या मताची मी नाही, असे वाघ यांनी यावेळी सांगितले.