हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कारवर खार पोलीस ठाण्याबाहेर शनिवारी जमावाने हल्ला केला. या प्रकरणी सोमय्यांसह भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेतली. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भल्ला यांना पत्र लिहले. त्यानंतर आता या हल्ल्याची केंद्रातील सीआयएसएफने गंभीर दखल घेतली असून यापुढे सोमय्यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले असल्याची चर्चा रंगली आहे.
किरीट सोमय्या यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या दरम्यान फडणवीसांनी लिहलेल्या पत्रानंतर सीआयएसएफच्या कमांडो विभागाने मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. यामध्ये सोमय्यांवरील हल्ल्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना कमांडोनी मागितले आहे.
सीआयएसएफच्या कमांडंटने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी संजय पांडे यांना सोमय्या यांच्यावरील हल्ल्याबाबत जाब विचारण्यात आला. तसेच या घटनेनंतर सीआयएसएफने सोमय्या यांच्या सुरक्षा ताफ्यातील सर्व जवानांना प्रत्येक कार्यक्रमात अतीदक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.