हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक गावांचेही पूल पाण्याखाली गेले असून गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे.
बुधवारपासून मुसळधारपणे कोसळलेल्या पावसामुळे चिपळूण शहर जलमय झाले आहे. या ठिकाणी अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे येथील प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. रात्रभर पडलेल्या ढगफुटीसद्रूश्य पावसामुळे तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणच्या अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. या ठिकाणी सध्या भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली असून शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे.
चिपळूणमध्ये २६ जुलै २००५ साली ढगफुटी झाल्यामुळे पाणी साचले होते. कोट्यवधींची हानीही झाली होती. यावर्षीही रात्रभर पडलेल्या पावसामुळे यावर्षीही महापुराची परिस्थिती परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान खात्याने चार दिवस हाय अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले आहेत.
शिवसेनेचे खासदार राऊत जाणार चिपळूणला…
दरम्यान, सध्या दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु आहे. त्या ठिकाणी अधिवेशनास शिवसेनेचे खासदार विनायक राऊत उपस्थित आहे. चिपळूणमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे या ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली असल्याने येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार दिल्लीहून थेट चिपळूणला जानार असल्याची माहिती समोर येत आहे.




