मुंबई । शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांना मंजुरी मिळाली असून शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे. ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यायी शिक्षण विभागाने तयारी दर्शवली होती. दरम्यान, मार्गदर्शक तत्वांनुसार राज्यात शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करता येणार.
राज्यात सरसकट शाळा सुरू होणार नाहीत तर जुलैपासून टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येतील. शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना सदर गावात कोरोनाच्या एकही रुग्ण नसेल याची खात्री करून शाळा सुरू होणार आहेत. तसेच जिथे महिनाभरात एकही रुग्ण आढळला नाही तिथले नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू करण्याची तयारी केली जाणार आहे. सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरू होतील आणि सर्वात शेवटी पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्यात येतील. अकरावीचे वर्ग दहावीचा निकाल लागल्यानंतर आधी प्रवेश प्रक्रिया होणार आणि ती पूर्ण झाल्यावर वर्ग सुरू करण्याची योजना शिक्षण विभागाची आहे. हे वेळापत्रक संभाव्य स्वरूपाचे असून स्थानिक परिस्थिती विचारत घेऊन त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
शाळा सुरु करताना पाळावयाचे नियम व अटी
१)विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आड वर्ग भरवण्याचीही मुभा
२)शाळा सुरू करण्यापूर्वी त्यांनी सॅनिटायझेशन करणे बंधनकारक
३)प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची अट
४)शिक्षक, विद्यार्थ्यांना मास्क घालणं बंधनकारक
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in