मुंबई । करोनाचा विषाणू कधी, कसा, कुठून हल्ला करतोय हे कळायला मार्ग नाही. त्यामुळं जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडतानाही मास्क वापरा. मात्र, त्याचा वापर छत्रीसारखा सामूहिक करू नका. प्रत्येकासाठी स्वतंत्र मास्क ठेवा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील आरोग्य सेवेचा आढावा घेतानाच मुख्यमंत्र्यांनी लोकांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या.
जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापराच, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आपण जर घराबाहेर वस्तूंसाठी घराबाहेर पडणार असणार तेव्हा पुढचे काही दिवस मास्क वापरले पाहिजेत. त्यात गैर काहीच नाही. घरातल्या स्वच्छ कापडाने चेहरा कव्हर करता येऊ शकतो. दुकानात जाऊन मास्क विकत घेण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरीही कापडाचा मास्क तयार करा आणि तो वापरा. किंवा स्वच्छ कपडा, रुमाल वापरा. मात्र हे मास्क हे छत्रीसारखे वापरु नका. ज्याचा मास्क आहे तो त्यानेच वापरावा असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
हे मास्क अत्यंत दक्षतेने वापरा. प्रत्येकानं स्वत:चाच मास्क वापरायचा आहे. एकाचा मास्क दुसऱ्याने वापरु नका. मास्क स्वच्छ गरम पाण्यानं धुवून, सुकवून वापरा, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. वापरलेले मास्क कचऱ्यात तसेच फेकून न टाकता काळजीपूर्वक आणि सुरक्षित जागा पाहून जाळून टाका, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केल्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”