”मी इथेच बसलोय, सरकार पाडून तर दाखवा”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवरुन शेअर केला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सरकार पाडून दाखवा, असे जाहीर आव्हान केलं आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी म्हटले आहे की, मी इथेच बसलोय. माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडून दाखवा. उद्धव यांच्या या वक्तव्यामुळे आता या संपूर्ण मुलाखतीविषयी राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागून राहिली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली ही २५ (उद्या) व २६ (रविवार) जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.

दरम्यान आजच्या प्रोमोत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि चीनविषयीही भाष्य केल्याचे दिसून आले. महाराष्ट्रात ३ चाकी सरकार आहे, असे म्हणतात. मग केंद्रात किती ४ चाकी सरकार आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच राष्ट्रीय राजकारणावर भाष्य करताना आत्ता तुम्हाला चीन नको आहे,. पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का?, अशी शंकाही उद्धव यांनी बोलून दाखविली आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमधून कोणता नवा संदेश दिला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडी सरकार ऑक्टोबरपर्यंत पडणार, अशी चर्चा सुरु आहे. त्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या या मुलाखती अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment