मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात पुन्हा वेगाने वाढते आहे. मुंबईत ३०० ते ३५० पर्यंत कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढते आहे. तर राज्यातही दरदिवशी ११ ते १२ हजार रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मागच्या वेळी झालेली परिस्थिती पुन्हा उद्भवायला नको असेल तर आताच काळजी घेणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह संवादाद्वारे सांगितले आहे. शहरी तसेच ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये रुग्णसंख्या वाढते आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात असली तरी अद्याप अनेकांनी लस घेतलेली नाही. ती घेणे देखील गरजेचे आहे असे ते म्हणाले.
नागरिक अजूनही चाचणी करून घेण्यास नकार देत असल्यामुळे नेमका कुणाला संसर्ग झाला आहे हे समजणे अवघड जात असल्याचे ते म्हणाले. दुसऱ्या लाटेत बर्याचजणांना लक्षणे जाणवत नाहीत परिणामी कुटुंबाच्या कुटुंबे संक्रमित होत आहेत. त्यामुळे चाचणी करून घ्या. शासकीय अलगाव अथवा घरी विलगीकरणात राहण्यास सांगितल्यास सहकार्य करा. म्हणजे आपण धोका कमी करण्यात यशस्वी होऊ शकू. तसेच लस घेतल्यावरही सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क घालणे, सतत हात धुणे आणि बंधिस्त जागी गर्दी होत असेल तर तिथे अलगावचे नियम पाळणे बंधनकारक केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक देशांना आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडल्या आहेत. तसेच तेथे संचारबंदीमुळेही प्रचंड नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. तो अनुभव लक्षात घेता आपण सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी जेव्हा अचानक रुग्णसंख्या वाढली तेव्हा आपल्याकडे रुग्णशय्या, व्हेंटिलेटर यांची कमतरता होती. औषधे तर आजही कमी प्रमाणात आहेत तसेच डॉकटर परिचारिका यांचीही उपलब्धता पुरेशा प्रमाणात नाही आहे. त्यामुळे नागरिकांनी संयमाने नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्या कारणाने केवळ एकच आठवडा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून त्या पुढच्या आठवड्यात होतील असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा