भाजपाचे जेलभरो आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ; काँग्रेसचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात ठीकठिकाणी भाजपकडून 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला. भाजपाचे जेलभरो आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.’ अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केली आहे.

चंद्रकांत हंडोरे म्हणाले, पाच वर्ष सत्तेत असताना झोपा काढल्या आणि आता मात्र सत्ता दिल्यास चार महिन्यात ओबीसी आरक्षण पुनर्स्थापीत करण्याचा भाजपाचा दावा हा हास्यास्पद आहे. भाजपाकडून चुकीची माहिती पसरवून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात आहे.

ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेली आकडेवारी सुप्रीम कोर्टाने मागितली तेव्हा केंद्र सरकारने ती दिली नाही. राज्यात व केंद्रातही भाजपाचे सरकार असताना जाणीवपूर्वक कोर्टाला आकडेवारी दिली नाही म्हणूनच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, असा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, भाजप आणि आरएसएस हे आरक्षण विरोधी आहेत. त्यांच्याच बेजबाबदारपणामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले. राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील जवळपास ५५ ते ५६ हजार जागांवर पाणी सोडावे लागणार आहे.’ असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.