भाजप विरोधात काँग्रेसचा प्लॅन ठरला; ‘भारत जोडो यात्रा’ संपताच सुरु करणार…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद जनतेकडून मिळाला. यानंतर काँग्रेसकडून पुढील पक्ष वाढीची घोषणा करण्यात आली असून भाजपला शह देण्यासाठी एक प्लॅन केलेला आहे. ‘भारत जोडो यात्रे’नंतर 26 जानेवारीपासून देशभरात ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ सुरू करणार असल्याचा निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आला आहे.

काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेच्या प्लॅनबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘भारत जोडो यात्रा’ संपल्यानंतर 26 जानेवारीपासून देशभरात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू केली जाणार आहे. ज्या अंतर्गत ब्लॉक, पंचायत आणि बूथ स्तरावर लोकांशी संपर्क साधला जाईल. हे अभियान दोन महिने चालणार आहे. या अभियाना मार्फत राहुल गांधी यांचे पत्र देखील लोकांच्या हाती दिले जाणार आहे. ज्यामध्ये या अभियानाचा संदेश असेल आणि त्यासोबत मोदी सरकारच्या विरोधात एक आरोपपत्रही जोडले जाईल.

देशभरात सुरु असलेलीच ‘भारत जोडो’ यात्रा 24 डिसेंबरला दिल्लीत पोहोचणार असून 26 जानेवारीला श्रीनगरमध्ये यात्रेची सांगता होईल. या नंतर ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ अंतर्गत तीनस्तरीय कार्यक्रम होणार आहे. यामध्ये जिल्हा स्तरावर अधिवेशने आणि राज्य स्तरावर रॅली काढण्यात येणार आहेत. यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते ‘हथ से हाथ जोडो अभियान’शी संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.