औरंगाबाद – जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष अस्तित्व शून्य असल्याचा दावा करून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल राजकारणात खळबळ उडवून दिली. कधीकाळी नंबर एक वर असलेल्या या दोन्ही पक्षांच्या अवस्थेला भाजप जबाबदार असल्याचे सांगून, आम्हीच भाजपला खिंडार पाडू असा शड्डु त्यांनी ठोकला.
विभागीय आयुक्तालयात आढावा बैठकीस राज्यमंत्री सत्तार आले होते. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शिवसेनेचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांच्या समक्ष राष्ट्रवादी भवनात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सोमवारी केली होती. यासंदर्भात सत्तार यांना पत्रकारांनी छेडले असता, ते म्हणाले की, टोपे यांच्या बोलण्याचा उद्देश काय होता मला माहिती नाही फोडण्या सारखे त्यांच्याकडे काय शिल्लक आहे ? त्यांना काही मदत लागली तर आम्ही करू, त्यासाठी समन्वय बैठक घेऊ. माझ्या तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असा वाद घालायचा नाही. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा एक नंबर वरून काँग्रेस-राष्ट्रवादी शून्यावर आले कारण भाजपने त्यांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी ओढून घेतले.
त्यांनी त्यांचे कार्यकर्ते सांभाळावे –
रोहयो मंत्री भुमरे म्हणाले की, राष्ट्रवादीचे कोणते कार्यकर्ते मी फोडले कुणाला धमक्या दिल्या त्यांची नावे समोर आणावेत. आता कार्यकर्ते धमक्या देऊन फुटत नाही. त्यांना त्यांचे कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत. राष्ट्रवादीने शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी फोडली तेव्हा आम्ही असे रडत बसलो नव्हतो सगळ्या विरोधात लढून जिंकून आलो.