कंगनाला मिळालेला पुरस्कार पाहून गोखलेंनाही ‘पद्मश्री’ व्हायचे दिसते; बाळासाहेब थोरातांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले. यावरून काँग्रेसचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विकरण गोखले यांना टोला लगावला आहे. “देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आणि महात्मा गांधींवर टीका केल्यावर पद्मश्री मिळतो आणि संरक्षण मिळते. अभिनेत्री कंगना रणावतलाही ते मिळाले आहे. तिचे संरक्षण आणि पद्मश्री पुरस्कार पाहून अभिनेते विक्रम गोखलेंनाही पद्मश्री व्हायचे दिसते, असा टोला थोरात यांनी लगावला.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना रणावत, अभिनेते विक्रम गोखले आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, कंगना म्हणते स्वातंत्र्य ही भीक आहे. 2014 साली खरे स्वातंत्र्य मिळाले. कसले स्वातंत्र्य मिळाले? हे बोलणे वेडेपणाचे आहे. कंगणाच्या वक्तव्यावर बोलण्यात अर्थ नाही. कुणी तरी बोलायचे मग लगेच त्यांना संरक्षण मिळते, त्यांच्या मागेपुढे 40 बॉडिगार्ड उभे राहतात.

जो वादग्रस्त बोलला त्याला त्रास होऊ नये म्हणून संरक्षण दिले जाते. पुढे लगेच पद्मश्री मिळते. असे पाहिल्यानंतर कदाचित विक्रम गोखले हे बोलायला लागले. त्यांनाही पद्मश्री व्हायचे दिसत आहे. एक गोष्ट लक्षात घ्यावी की, स्वातंत्र्यासाठी काहींचा त्याग झाला घरावर नांगर फिरला. स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या विचारामुळेच स्वातंत्र्य मिळाले. अनेकजण शहीद होत होते. एकजुटीने पुढे येऊन अंगावर गोळ्या झेलत होते. इतकी प्रेरणा त्यांना गांधी विचारातून मिळाली होती. आजही जगात जिथे जिथे चळवळ चालते तिथे तिथे महात्मा गांधींचं नाव घेऊन चळवळ चालते, असे थोरात यांनी म्हंटले.