हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल त्याठिकाणी नव्हते. यावरून वस्त्रोद्योग मंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी टीका केली आहे. “राज्यपालांना अभिनेत्री कंगनाला भेटायला वेळ आहे. पण शेतकऱ्यांना नाही,” अशी टीका शेख यांनी केली.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला. यावेळी मुंबईत आंदोलन करीत काँग्रेस नेते आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना आंदोलनातील मागण्यां बाबत निवेदन देण्यासाठी गेले असता राज्यपाल त्याठिकाणी हजर नव्हते. यावरून काँग्रेस नेते शेख यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्यपालांना भेटण्यासाठी त्यांच्यापुढे शेतकऱयांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही गेलो असता ते हजर न्हवते. ते बाहेर दौऱ्यावर गेले होते.. तरीही आतमध्ये आम्ही आंदोलन केले.
राज्यपालांना शेतकऱ्यांची बाजूच ऐकून घ्यायची नव्हती म्हणून राज्यपाल हजर राहीले नाहीत. आम्ही शेतकऱ्यांची मागणी घेऊन गेलो होतो. मात्र, त्यापेक्षा राज्यपाल कंगना राणावत, भाजप नेत्यांनाभेटण्यासाठी गेले. सध्या भाजप नेत्याची भाषा दादागिरीची आहे. नागरिकांकडून आजच्या बंदला सहकार्य मिळू नये म्हणून अनिल देशमुख यांच्यावर कारवाई पुन्हा दाखवली जात आहे, असेही शेख यावेळी म्हणाले.