मुंबई प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा अजूनही कोणत्याही पक्षाने केला नाही आहे. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आज उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेतबाबत एकमेकांवर खोटारडेपणाचे आरोप केले असतांना. तिकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे बडे नेते शरद पवार यांच्या घरी बैठकीला हजर आहेत.
शरद पवार यांच्या सिल्वर ओक या मुंबईस्थित निवासस्थानी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, मणिकराव ठाकरे दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील सध्याच्या सत्ताकोंडीत दोन्ही काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार का या चर्चेला आता उधाण आले आहे.
आज दिवसभर सत्तास्थापनेचे नाट्य चालूच राहिले. दुपारी संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून त्यांच्यात काय चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यातच आहे. तेव्हा राज्यात सत्तास्थापन करण्यात अपयशी ठरली असतांना त्यांना पर्याय म्हणून विरोधक सरकार स्थापन करणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.