हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात, हिमाचल प्रदेश या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल (Election Result) आज लागणार आहेत. गुजरात मध्ये सध्या भाजप आघाडीवर आहे तर हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेस अन भाजप यांच्यात कांटे कि टक्कर होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसला ऑपरेशन लोटस ची भीती असून हिमाचल काँग्रेस आपल्या विजयी आमदारांना राजस्थानच्या रिसॉर्टमध्ये हलवणार असल्याची चर्चा आहे.
आज सकाळपासून गुजरात, हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार सध्या काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे तर भाजप ३० जागी आघाडीवर आहे. आज संध्याकाळपर्यंत निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र असे असले तरी काँग्रेसला भाजपच्या ऑपरेशन लोटसची भीती आहे. यामुळेच काँग्रेस सावध पवित्रा घेत आपल्या आमदारांना राजस्थानातील रिसॉर्ट मध्ये हलवणार असल्याची माहिती आहे.
यंदा जवळपास ९१ अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे. त्यापैकी सुमारे दोन डझन उमेदवार तर बंडखोर आहेत. हे बंडखोर उमेदवार पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची मते खाऊ शकतात. ज्या अपक्षांच्या जिंकण्याच्या शक्यता अधिक आहेत, अशांवर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी लक्ष केंद्रित केले होते.