सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटा आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी यासाठी बुधवारी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मिरज शहर काँग्रेस अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्या उपस्थितीत मिरजेतील गांधी पुतळा, मिशन हॉस्पिटल चौक येथे निदर्शने करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. ‘मजुरांना मदत करणे हा जर गुन्हा असेल, तर हो, काँग्रेसने तो गुन्हा केलाय’, ‘महाराष्ट्र द्रोही भाजप, महाराष्ट्र द्रोही मोदी’, ‘नमस्ते ट्रम्प, करणारे मोदीच खरे कोरोना स्प्रेडर’, ‘शर्म करो मोदीजी’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्राप्रती थोडीफार आस्था असेल तर त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करावा अन्यथा महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची ‘महाराष्ट्र द्रोही’ म्हणून नोंद केली जाईल अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सत्तेतून दूर केल्यापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्र द्वेषाची कावीळ झाली असल्याची टीका करत काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.