हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र काँग्रेस मुळेच देशभर कोरोना पसरला असा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर राजकारण तापलं आहे. मोदींच्या या गंभीर आरोपांना काँग्रेसने तात्काळ प्रत्युत्तर देत कोरोना काळात केलेल्या मदतकार्याची यादीच आपल्या ट्विटर हँडल वरून जाहीर केले आहे.
काँग्रेसनं दिलेली मदतकार्याची यादी
महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं राज्यातील 1 कोटी 10 लाख नागरिकांना धान्य, प्रवास आणि आरोग्य किटचे वाटप
2 लाख 10 हजार स्थलांतरित मजूर आणि गरजू नागरिकांना नियमित भोजनाची व्यवस्था
सुमारे 36.5 लाख नागरिकांना धान्य आणि रेशन किटचे वाटप
श्रमिक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून 22 हजार 702 मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवले. काँग्रेसनं प्रवास खर्च उचलला. काँग्रेसनं 11 श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांचा पूर्ण खर्च आणि 24 श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांचा अंशत: खर्च उचलला.
1 लाख 33 हजार 992 स्थलांतरित मजुरांना आणि 2 हजार 577 विद्यार्थ्यांना स्वत:च्या राज्यात जाण्यासाठीचा वाहतूक खर्च काँग्रेस पक्षानं उचलला. काँग्रेस पक्षानं खासगी वाहतूक व्यवस्था आणि रेल्वे प्रवासाचा खर्च उचलला.
स्थलांतरित मजुरांसाठी प्रत्येक जिल्हानिहाय हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली होती.
हेल्पलाईन द्वारे थेट 40 लाख नागरिकांना महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं मदत करण्यात आली.
कोरोनाच्या काळात मोदी सरकारने ज्यांना वाऱ्यावर सोडलं त्यांना मदतीचा हात देणं आम्ही आमचं कर्तव्य समजलं.
सुटाबुटाच्या मोदी सरकारमध्ये गिनतीत नसलेल्या गोरगरीब जनतेला मदत करणे हा गुन्हा असेल तर काँग्रेस पक्ष असे गुन्हे करत आलाय, करतोय आणि पुढेही करत राहील!#महाराष्ट्राद्रोही_bjp pic.twitter.com/BDEUd4yYx4
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 7, 2022
24.6 लाख नागरिकांना औषधे आणि आरोग्य संवर्धक किटचे वाटप
डॉक्टर, नर्सेस, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 14 हजार पीपीई किटचे वाटप
रक्ताचा तुटवडा जाणवल्यानंतर 20 हजार काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रक्तदान
सांगली, नागपूर, पुणे, मुंबई, रायगड आणि कोल्हापूर येथे स्थलांतरित मजुरांसाठी मोबाईल क्लिनिकची सुरुवात
मोदी नेमकं काय म्हणाले
महाराष्ट्र काँग्रेस मुळे कोरोना देशभर पसरला. उत्तर प्रदेश, बिहार येथील मजुरांना मुंबई महाराष्ट्रातून पलायन करण्यास काँग्रेसने भाग पाडले. त्यांना मोफत तिकिटं देऊन महाराष्ट्राबाहेर पिटाळण्यात आले. त्यामुळेच जिथे करोना कमी होता त्या राज्यांनाही करोनाचा विळखा पडला असे म्हणत मोदींनी काँग्रेस वर टीका केली.