हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणाच्याबाबत काल न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता ओबीसी नेत्यांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान या मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रावर टीका केली आहे. “ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी असून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडे इम्पिरिकल डेटा मागितला होता पण केंद्राने तो देण्यास नकार दिला, असा आरोप पटोले यांनी केला आहे.
टिळक भवन येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “मी विधानसभा अध्यक्ष असताना जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करणारा ठराव मांडला. विधानसभेने तो एकमताने मंजूर केला होता पण केंद्र सरकार जातीनिहाय जनगणनाही करत नाही आणि ओबीसींची इम्पिरिकल डेटाही देत नाही.
ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी
सुप्रिम कोर्टाने केंद्र सरकारकडे इम्पिरीकल डेटा मागितला होता पण केंद्राने तो देण्यास नकार दिला.
मी विधानसभा अध्यक्ष असताना जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करणारा ठराव मांडला विधानसभेने तो एकमताने मंजूर केला होता पण… 1/2— Nana Patole (@NANA_PATOLE) December 6, 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर देशाचा कारभार आतापर्यंत चालत आला आहे. मात्र, मागील काही वर्षापासून संविधानातील मुल तत्वांना तिलांजली दिली जात आहे. संविधानच संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असून हिच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल, असे पटोले यांनी म्हटले आहे.