नवी दिल्ली । ख्यातनाम वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण हे न्यायालय अवमानना प्रकरणात दोषी आढळल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात शिक्षेवर सुनावणी सुरू आहे. या दरम्यान प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास नकार दिलाय. आपल्याला ज्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलंय त्या प्रकरणाच्या तक्रारीची प्रतही आपल्याला अद्याप सर्वोच्च न्यायालयाकडून पुरवण्यात आलेली नाही, असं सांगत प्रशांत भूषण यांनी आपल्या वादग्रस्त ट्विटबद्दल माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिलाय.
‘मला न्यायालयाकडून कोणत्याही दयेची अपेक्षा नाही. न्यायालयाकडून शिक्षा मिळण्याची भीती नाही. या गुन्ह्यासाठी मिळेल त्या शिक्षेसाठी आपण तयार’ असल्याचं प्रशांत भूषण यांनी म्हटलं. माझं ट्विट एक नागरिक म्हणून मी कर्तव्य पार पाडताना केलं होतं. यामुळे कुणाचीही अवमानना होत नाही. या ऐतिहासिक वळणावर मी बोललो नसतो तर मी माझ्या कर्तव्यात अयशस्वी ठरलो असतो. माझं माफी मागणंच अवमानना असेल, असं प्रशांत भूषण यांनी म्हटलं.
प्रशांत भूषण यांनी न्यायपालिका आणि सरन्यायाधीश यांच्याविरुद्ध केलेल्या दोन ट्विटसमुळे त्यांच्यावर ही कारवाई सुरू आहे. ‘माजी १६ सरन्यायाधीशांमध्ये निम्म्याहून अधिक सरन्यायाधीश भ्रष्ट होते’ असं ट्विट प्रशांत भूषण यांनी २००९ मध्ये केलं होतं. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत भूषण दोषी आढळल्याचं म्हटलं. यावर प्रशांत भूषण यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार असल्याचं न्यायालयासमोर म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”