हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील शेतकरी अवकाळी पाऊस, कर्जाचा डोंगर, बाजारात मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशातच साखर व कृषी पणन मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांचा अपमान होईल, असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी, “शेतकऱ्यांचा कर्ज माफ व्हावे म्हणून राज्यात वारंवार दुष्काळ पडावा अशी शेतकऱ्यांची इच्छा असते,” असे म्हणले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोमवारी विरोधकांनी, मंत्री शिवानंद पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
बेळगाव येथे रविवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले होते की, “कृष्णा नदीचे पाणी मोफत मिळते. वीज फुकट मिळते. मुख्यमंत्र्यांनी बियाणे आणि खतही मोफत दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अशी इच्छा होईल की, पुन्हा दुष्काळ पडावा, कारण त्यांमुळे आपले कर्ज माफ होईल. तुम्ही अशी इच्छा करू नका, तुमची इच्छा नसली तरी तीन-चार वर्षांतून एकदा दुष्काळ पडेल.” त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळेच विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
त्याचबरोबर, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी पाटील यांच्या वक्तव्याला बेजबाबदारीचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना विजयेंद्र म्हणाले, देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात काँग्रेस सरकारची ही वृत्ती दुर्दैवी असून भाजप त्याचा तीव्र निषेध करत आहे. पाटील यांनी शेतकरी आणि शेती संस्कृतीचा अपमान केला आहे. त्यामुळे ते मिनिटही मंत्रिपदी राहण्यास योग्य नाहीत”
दरम्यान, मंत्री शिवानंद पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. तसेच, त्यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. सध्या शेतकरी राजा अनेक अडचणींच्या कचाट्यात सापडला असताना पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.