धक्कादायक! मुंबईत १००हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता

0
33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. राज्याची राजधानी असलेलं मुंबईला कोरोनाचा सर्वात जास्त तडाखा बसला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या २१ हजारांहून अधिक झाली आहे. कोरोनाला रोखण्याचं आव्हान असतानाच, महापालिकेला एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रयोगशाळांमध्ये चाचणी करताना, चुकीचा पत्ता आणि मोबाइल नंबर देणाऱ्या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांचा शोध घेणं अडचणीचं ठरत आहे. महापालिकेनं ही माहिती दिली. कोरोना चाचणीवेळी संबंधित व्यक्तीचा संपर्क क्रमांक, निवासी पत्ता घेतला जातो. त्यातील काही जण योग्य माहिती देत नाहीत किंवा प्रयोगशाळांतील कर्मचारी अनावधानानं चुकीची माहिती भरतात. अशावेळी चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत आहेत.

मुंबईत पॉझिटिव्ह असलेले असे १०० हून अधिक रुग्ण सध्या ‘बेपत्ता’ आहेत. हे अनेक कारणांमुळे होत असून, त्यात रुग्णांची माहिती चुकीची नोंदवणे हे मुख्य कारण आहे, असं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबई मिररला सांगितले. अशा रुग्णांचा शोध घेण्याचे अनेक मार्ग आमच्याकडे आहेत. मालमत्ता नोंदणी किंवा मतदार यादीत आम्ही त्यांची नावे शोधतो. सोमवारी मी वांद्रे पूर्व विभागाचा आढावा घेत असताना, काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या आणि वांद्रे पूर्व असा पत्ता सांगितला. अशावेळी त्या व्यक्तींचा शोध घेणं कठीण होऊन जातं, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आधार क्रमांकच्या माध्यमातून ‘बेपत्ता’ असलेल्या व्यक्तींची सविस्तर माहिती मागितली आहे. मात्र, त्यांना अद्याप तशी मान्यता मिळालेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. एन प्रभागात विक्रोळीतून १२ करोनाबाधित रुग्ण गायब आहेत. अधिकारी त्यांचा शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही अशा करोनाबाधित रुग्णांमध्ये अंधेरी पूर्वेकडील २७ जण आहेत. त्यातील अनेक जण झोपडपट्टी परिसरातील आहेत. धारावीत २९ व्यक्तींचा अद्याप कोणताही ठावठिकाणा नाही. त्यातील काही जणांचा शोध घेण्यात यश मिळालं आहे. खासगी प्रयोगशाळांमध्ये चुकीचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक देऊन चाचणी करणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here