नवी दिल्ली । महाराष्ट्रातील स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक होत चालली आहे. करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. राज्यातील ३६ पैकी ३४ जिल्ह्यांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक आयोजित करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
महाराष्ट्रात १५,५२५ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर ६१७ जणांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर २८१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांपैकी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, सोलापूर येथील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून एकही नवीन रुग्ण आढळू नये यासाठी प्रयत्न करू. यासाठी महाराष्ट्र सरकारला हवी ती मदत केंद्राकडून केली जाईल, असं हर्षवर्धन म्हणाले.
महाराष्ट्रात करोनाचे जवळपास १०२६ कंटेन्मेंट झोन झाले आहेत. केंद्र सरकारचं वैद्यकीय पथक आणि डॉक्टर्स मुंबईत आहेत. महाराष्ट्र सरकारला आवश्यक मदत केली जाईल, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”