नवी दिल्ली । देशभरात हैदोस घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आता राष्ट्रपती भवनाच्या दारात पाऊल ठेवलं आहे. राष्ट्रपती भवन परिसरात काम करणाऱ्या एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर या परिसरातील जवळपास 100 कुटुंब सेल्फ क्वॉरंन्टाईन करण्यात आली आहेत. राष्ट्रपती भवनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुख्य इमारतीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं कुटुंब राहतं, तिथे मात्र कोरोनाचा कुठलाही धोका पोहचलेला नाही. राष्ट्रपती भवनाचा परिसर हा काही शेकडो एकरांमध्ये विस्तारलेला आहे. याला प्रेसिडेन्शियल इस्टेट असं म्हटलं जातं. या संपूर्ण परिसराची देखभाल करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले कर्मचारी या परिसरातच राहतात. त्यांच्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर खबरदारी म्हणून या परिसरातल्या 100 कुटुंबांचं विलगीकरण करण्यात आलं आहे.
गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा कोरोनाचं संकट राष्ट्रपती भवनाच्या जवळ पोहचलं आहे. गेल्या मार्च महिन्यात गायिका कनिका कपूर कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. लखनौमध्ये तिच्या पार्टीत हजर असलेले भाजपचे खासदार दुष्यंत सिंह हे नंतर खासदारांच्या शिष्टमंडळासह राष्ट्रपतींना भेटले होते. त्याचवेळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, राष्ट्रपतींनी खबरदारी म्हणून प्रोटोकॉलचं पालन करत विलगीकरण केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राज्यपालांसोबत होणाऱ्या काही भेटीगाठीही व्हिडिओ कॉन्फरन्सच्याच माध्यमातून होत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रापाठोपाठ देशात सध्या सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण दिल्लीत आहेत. दिल्लीत आत्तापर्यंत 2 हजार 081 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर 47 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीत 76 हॉटस्पॉट केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निश्चित केले आहेत. यातील एका सील केलेल्या परिसरात दोन दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील 26 जणांना करोनाची लागणं झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यात आता देशातल्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या राष्ट्रपती भवनातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”