उर्वरित आयपीएल सामने घेण्यासाठी BCCI ची धावाधाव, ECB ला केली ‘ही’ विनंती

ipl trophy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने उर्वरित आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. आयपीएलच्या 31 सामने अजून बाकी आहेत. जर हे सामने झाले नाहीत तर बीसीसीआयचे 2500 कोटींचे नुकसान होणार आहे. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआयने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला विनंती केली आहे. बीसीसीआयने इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाला एक पत्र लिहिले आहे त्यामध्ये त्यांनी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिज एक आठवडा आधी सुरु करण्याची विनंती केली आहे.

आयपीएल स्पर्धेचे आयोजन सप्टेंबरमध्ये करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज नियोजित वेळापत्रकानुसार 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. जर हि सीरिज एक आठवडा आधी सुरू झाली तर ती 7 सप्टेंबर रोजी संपेल.आयपीएलला अधिक वेळ मिळावा म्हणून बीसीसीआयकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

3 आठवड्यात होणार 31 मॅच
जर भारत- इंग्लंड टेस्ट सीरिज 7 सप्टेंबर रोजी संपली तर सप्टेंबर महिन्यातील उर्वरित 3 आठवड्यांमध्ये आयपीएलच्या उर्वरित मॅच घेण्याची योजना बीसीसीआयकडून तयार करण्यात येत आहे. एका दिवसामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त मॅच घेतल्या जाऊ शकतात. ऑक्टोबर महिन्यात T20 वर्ल्ड कप होणार आहे त्यामुळे या वर्ल्ड कपपूर्वी आयपीएल स्पर्धा घेण्याचा प्रयत्न बीसीसीआय करत आहे.

ECB समोर पेच
इंग्लंड क्रिकेट बोर्डकडून 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘द हंड्रेड’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. जर भारत-इंग्लंड टेस्ट सीरिज लवकर संपवायची असेल तर बोर्डाला ब्रॉडकास्टरचे वेळापत्रक, हॉटेल, बायो-बबल आणि तिकीट विक्री या सर्वांची नव्याने तयारी करावी लागणार आहे. भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाचे संबंध चांगले असल्यामुळे बीसीसाीआयच्या विनंतीवरुन इंग्लंड क्रिकेट बोर्ड टेस्ट सीरिजमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.