मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच टीम इंडियाचा कर्णधार होईल,असा दावा राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांच्याकडून करण्यात आला आहे. रोहित शर्माला टीम इंडियाच्या वन-डे आणि टी-20 टीमचा कॅप्टन करण्यात यावे अशी मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली होती. रोहितला आता कॅप्टन करण्याची वेळ आली आहे असे मत किरण मोरे यांनी व्यक्त केले आहे. तसेच टेस्ट आणि वन-डे टीमसाठी वेगवेगळे कर्णधार करण्याची पद्धत लवकरच टीम इंडियात सुरु होईल, असेदेखील किरण मोरे म्हणाले.
इंग्लंड दौऱ्यानंतर निर्णय
“विराट कोहली त्याच्या करियरमधील मोठा भाग महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) कॅप्टनसीमध्ये घालवला आहे. तो नजीकच्या भविष्यात रोहितसोबत जबाबदारी शेअर करण्याचा विचार करु शकतो. बीसीसीआयचे व्हिजन देखील या विचारांना बळ देणार आहे. रोहित शर्माला लवकरच संधी मिळेल. कोहली एक हुशार कॅप्टन आहे. तो धोनीच्या कॅप्टनसीमध्ये खेळला आहे. वन-डे आणि टी20 टीमची कॅप्टनसी आणखी किती दिवस करायची याचा विचार तो करेल. इंग्लंड दौऱ्याच्या नंतर याबाद्दलचा निर्णय होऊ शकतो.” असे मत राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी मांडले आहे.
तसेच किरण मोरे पुढे म्हणाले, “स्पिल्ट कॅप्टनसीचा प्रयोग भारतामध्ये यशस्वी होऊ शकतो. टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू काय विचार करतात हे महत्त्वाचे आहे. विराट कोहलीसाठी एकाच वेळी तीन टीमची कॅप्टनसी करणे सोपे नाही. त्याचबरोबर त्याला देखील चांगली कामगिरी करायची आहे. तीन्ही टीमची कॅप्टनसी करणे आणि टीमला विजय मिळवून देताना चांगल्या खेळाच्या प्रदर्शनासाठी मी विराटला श्रेय देतो. पण आता लवकरच रोहितला कॅप्टन करा, असे विराट स्वत: सांगेल.” असे संकेत किरण मोरे यांनी दिले आहेत.
” हा भारतीय क्रिकेटसाठी सकारात्मक संदेश असणार आहे. रोहित शर्मा चांगली कामगिरी करत असेल, तर त्याला संधी मिळाली पाहिजे. माझ्या मते विराट कोहली याचे उदाहरण घालून देईल. आपल्याला किती आराम करायचा आहे. टेस्ट आणि वन-डे टीमची कॅप्टनसी करायची आहे का?, हे विराटने ठरवणे गरजेचे आहे. तो देखील माणूस आहे. त्याला देखील मानसिक थकवा येतो.” असे मत किरण मोरे यांनी स्पष्ट केले आहे.