हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर मैदानात फलंदाजीसाठी यायचा तेव्हा लोक फक्त त्यालाच पहायचे. इतकेच नाही तर सचिन आउट झाला कि लोक स्टेडियम सोडून घरी परतायचे. सचिनची अशी क्रेझ केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातही दिसून आली. म्हणूनच आजही लोक त्याला क्रिकेटचा देव म्हणतात. असंच काहीसं एका बांगलादेशी क्रिकेटपटूंनेही केले आहे. ज्याचे छायाचित्र त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आणि अवघ्या काही वेळातच ते व्हायरलही झाले.
वास्तविक बांगलादेशचा खेळाडू असलेल्या मोहम्मद अश्रफूलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेटपटू होण्यापूर्वी बॉल बॉय म्हणून काम केले होते. सचिनला पहिल्यांदा त्याने बांगलादेशातील बंगबंधू राष्ट्रीय स्टेडियमवर खेळताना पाहिले आणि त्यावेळी त्याच्याबरोबर फोटोही काढला. बऱ्याच वर्षानंतर अश्रफूलने तो फोटो तेंडुलकरला दाखवला तेव्हा तो फोटो पाहून मास्टर ब्लास्टर आश्चर्यचकित झाला. अश्रफूलने तो संपूर्ण किस्सा युट्यूब थेट व्हिडिओवर शेअर केला आहे .
बांगलादेशचा खेळाडू असलेल्या अश्रफूलने सचिनसह त्याच्या घरी पार्टीमध्ये हरभजन सिंग आणि तत्कालीन मुंबई इंडियन्सचे व्हिडिओ विश्लेषक यांनाही बोलावले होते. त्यावेळी सचिन अश्रफूलच्या घरी जसे जेवत होता ते पाहून या अश्रफूलला आश्चर्यच वाटले. त्याला असे वाटत होते की सचिन आपल्या वैयक्तिक आयुष्यात कमी खात असेल आणि तंदुरुस्तीवर अधिक भर देत असेल. मात्र अश्रफूल म्हणाला की त्याच्या आईने पुलाव, रोटी, भात, मासे, भाज्या, दही आणि मिठाई बनवले होते आणि सचिनने हे सर्व अगदी दाबून खाल्ले.
तो म्हणाला, ‘माझ्यावर विश्वास ठेवा की, माझ्या आईने जे जेवण बनवले होते, सचिनने सर्व काही खाल्ले. त्याने भरपूर दही आणि मिठाई देखील खाल्ली. तुम्ही इतके कसे खाऊ शकतो हे मी त्यांना विचारू शकलो नाही. ‘ अश्रफूलने सांगितले की एकदा सचिन स्वत:च म्हणाला होता, ‘मी बहुतेक वेळा कमीच खातो, मी बर्याच वेळा भाज्या खातो, परंतु जेव्हा कधी मला वाटते तेव्हा मी मनापासून जेवतो.’
अश्रफूलने बांगलादेशकडून एकूण १७७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच त्याच्या खात्यात ३४९८ धावा आणि १८ विकेटही जमा आहेत. अशरफुलने आतापर्यंत ६१ कसोटी सामने आणि २९ आंतरराष्ट्रीय टी -२० सामनेही खेळले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.