लंडन : वृत्तसंस्था – 18 जून पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या फायनलसाठी टीम इंडिया प्रमाणे न्यूझीलंडने देखील जय्यत तयारी सुरु केली आहे. न्यूझीलंडच्या याच योजनेचा भाग म्हणून इंग्लंडमध्ये गुरूवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंड त्यांच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणार आहे.
न्यूझीलंडचा फास्ट बॉलर ट्रेंट बोल्ट दुसऱ्या टेस्टसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे टीम साऊदी, नील वेग्नर आणि काईल जेमीसन यांच्यापैकी एकाला विश्रांती देण्यात येणार आहे. न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. फायनल मॅचसाठी आमचे प्रमुख बॉलर ताजे राहावे आणि त्यांनी भारताविरुद्ध पहिल्या बॉलपासून चांगले प्रदर्शन करावे यासाठी आम्हाला खबरदारी घ्यावी लागेल असे न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी सांगितले आहे. तसेच आम्ही 20 खेळाडूंसह इथे आलो आहोत. आमच्या टीममधील अनेकांना टेस्ट क्रिकेटचा अनुभव आहे. मॅट हेन्री, डॅरिल मिचेल, डग ब्रेसवेल, एजाज पटेल यासारखे खेळाडू यापूर्वी टेस्ट खेळले आहेत.” याची आठवणदेखील कोच गॅरी स्टीड यांनी करून दिली आहे.
न्यूझीलंडला मोठा धक्का
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी न्यूझीलंडच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. या फायनलआधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन आणि डावखुरा स्पिनर मिचेल सॅन्टनर यांना दुखापत झाली आहे. विलियमसनच्या कोपराला तर मिचेल सॅन्टनरच्या बोटाला दुखापत झाली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याची माहिती दिली आहे. त्यामुळे हे दोघेही गुरुवारपासून सुरु होणारी दुसरी टेस्ट खेळण्याची शक्यता कमी आहे.