‘कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, पण…’ युवराज सिंगचा खुलासा

Yuvraj Singh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंगला प्रमुख मॅच विनर बॅट्समन म्हणून ओळखले जायचे. टी 20 वर्ल्ड कप 2007 आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2011 या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने महत्वाची भूमिका निभावली होती. त्याने एवढे योगदान देऊनदेखील तो कधीहि टीम इंडियाचा कॅप्टन झाला नाही. युवराज सिंगने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. युवराजने एका मुलाखतीत आपल्याला कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, असा खुलासा केला आहे. दक्षिण आफ्रिकेत 2007 साली झालेल्या पहिल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये आपल्याला कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, पण महेंद्रसिंह धोनीचे कॅप्टन म्हणून नाव जाहीर झाले असे युवराज सिंगने सांगितले आहे.

काय म्हणाला युवराज सिंग
“भारताचा त्यावर्षी झालेल्या 50 ओव्हर्सच्या वर्ल्ड कपमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे टीम इंडियामध्ये बऱ्याच घटना घडत होत्या. इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये या देशांचा दोन महिन्यांचा दौरा होता. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत टी 20 वर्ल्ड कप होणार होता. त्यावेळी टीममधील सीनियर्सनी ब्रेक घेण्याचे ठरवले होते.कुणीही टी 20 वर्ल्ड कप गांभीर्याने घेतला नव्हता. मला मात्र त्यावेळी कॅप्टन होईल असे वाटले होते, पण धोनीच्या नावाची कॅप्टन म्हणून घोषणा झाली.” असे युवराजने सांगितले आहे.

महेंद्रसिंह धोनी कॅप्टन झाल्यानंतर त्याच्यात आणि आपल्या संबंधांमध्ये याचा कोणताही परिणाम झाला नाही असेदेखील युवराजने सांगितले आहे. टीमचा कॅप्टन राहुल द्रविड, सौरव गांगुली किंवा अन्य कुणीही असला तरी एक टीममधील खेळाडू म्हणून शंभर टक्के योगदान देणे हे माझे कर्तव्य होते. असे युवराज सिंगने स्पष्ट केले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या कॅप्टनसीखाली टीम इंडियाने 2007 साली झालेला टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कप विजेतेपदानंतरच भारतीय क्रिकेटमध्ये धोनी युगाला सुरुवात झाली होती.