मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘देशात सत्य मांडणं गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही करणार’ असं अंधारे यांनी म्हटलं आहे. ‘ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत गर्दी शिंदे गटाच्या डोळ्यात खुपली असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, मला अजून नोटीस आलेली नाही, मात्र नोटीस आली तर पोलीस स्टेशला हजर राहण्यास काहीच हरकत नाही. कारण मी वारंवार सांगते कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. त्यामुळे माझ्या बापाने लिहिलेल्या कायद्याचा मी आदर नाही करायचा तर कोणी करायचा? मी कायद्याचा आदर करणार आहे. नोटीस आल्यास त्या नोटीशीला जे काय असेल ते कायदेशीर उत्तर पण देणार आहे.
उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तीन नाहीतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचीही माहिती सुषमा अंधारे यांनी दिली. दसरा मेळाव्यानंतर आता पक्षाचे नांव व चिन्ह वाटपानंतरही दोन्ही गटात जोरदार खंडाजंगी पहायला मिळत आहे. अशातच आता उध्दव ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने आणखी वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.