पुणे प्रतिनिधी| शुभम भोकरे
पावसाने संपूर्ण राज्यात हाहाकार माजवलेला आहे. दिवाळीच्या सणानिमीत्त ४ पैसे कमावू या विचारात असणाऱ्या फटाका विक्रेत्यांवर ऐन दिवाळीत पावसाने संक्रांत आणली आहे. पत्र्याच्या शेडमध्ये फटाके विक्रीस ठेवणाऱ्या पुण्यातील फटाका स्टॉलवाल्यांना पाऊस आणि थंडी अशा दोन्ही संकटांचा सामना यानिमित्ताने करावा लागत आहे. डेक्कन परिसरात भिडे पूल ओलांडल्यानंतर ओंकारेश्वर मंदिराजवळ फटाका विक्रेत्यांना दरवर्षी जागा उपलब्ध करून देण्यात येते. ही जागा साधारण दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसाने पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. आताही पावसाचा जोर असाच राहिला तर फटाका विक्रेत्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
एवढा पाऊस येणार हे आधीच माहीत असतं तर कंपनीला आधीच वॉटरप्रूफ फटाके बनवण्याची ऑर्डर दिली असती असं मजेशीर वक्तव्य स्वामी छाया फटाका मार्टच्या तेजस काळे यांनी केलं आहे. आधीच पर्यावरणाविषयी खूप कळवळा असणारे फटाके वाजवू नका म्हणून सांगतात, त्यातूनही जे घेणारे असतात ते पण पावसामुळे आलेच नाहीत तर आमचा धंदा कसा चालणार अशी खंतही अनेक फटाका स्टॉलवाल्यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली.