दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी; मुंबईत एकच खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील प्रवाशांनी सर्वात जास्त गजबजलेलं आणि मध्यवर्ती रेल्वे स्थानक म्हणून दादर रेल्वे स्टेशनची (Dadar Railway Station Threat Call) ओळख आहे. याठिकाणी नेहमीच प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळते. मात्र हेच दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. काल मध्यरात्री एका अज्ञात कॉल वरून ११२ या हेल्पलाईनवर धमकीचा फोन आला आणि मुंबईत एकच खळबळ उडाली. पोलिसांनी (Mumbai Police) तातडीने ऍक्शन मध्ये येत याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

मुंबईत गेल्या काही महिन्यापासून अशा प्रकारच्या धमकीचे फोन सतत येत आहेत. आताही विकास शुक्ला नावाच्या इसमाने कॉल करून दादर स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली. या धमकीच्या कॉल नंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलिसांनी कोणताही वेळ न गमावता तातडीने BDDS पथकासह दादर रेल्वे स्टेशन पिंजून काढले आणि दादर रेल्वे स्थानकावर काही संशयित वस्तू आढळते का ते चेक केलं. मात्र कोठेही कोणतीच संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.

यानंतर पोलिसांनी सदर कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला. वसईच्या पेल्हार पोलिसांनी सदर आरोपी विकास शुक्लाला ताब्यात घेतलं. विकासने हा धमकीचा कॉल का केला? यामागील त्याचा नेमका हेतू काय होता? त्याच्यासोबत आणखी कोणी साथीदार आहेत का ? याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र अचानक आलेल्या या धमकीच्या कॉलमुळे मोठी खळबळ उडाली आहे.