पिंपरी – चिंचवड | टिंडर आणि बंबल अश्या वेगवेगळ्या डेटिंग ॲपवरून मुलांशी मैत्री करून त्यांना डेटला बोलवून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध पडल्यानंतर त्या मुलांना लुबाडणाऱ्या तरुणीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून 289 ग्राम सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा पंधरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच तिने एकूण 16 मुलांना फसवल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे.
साधू वासवानी रोड येथील रहिवाशी सायली देवेंद्र काळे या 27 वर्षीय तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणीने बंबल या डेटिंग ॲपवरून एका तरुणाला रावेत येथे भेटायला गेली. त्याला भेटीदरम्यान गुंगीचे औषध दिले. त्यानंतर मुलाकडील दागिने आणि रोकड असा एक लाख पांच्याऐशी हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला. असाच प्रकार वाकड येथील मुलाशीही तिने केला. त्याच्याकडून एकूण दीड लाखांचा मुद्देमाल पळवला. अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पुण्यातील नसलेल्या तरुणांना हेरून ही तरुणी त्यांच्याशी ओळख करून त्यांना भेटायला लॉजवर किंवा संबंधित तरुणाच्या घरी जात असे. घरी गेल्यानंतर पेयामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून, गुंगी आल्यानंतर ती मुद्देमाल घेऊन पळ काढत असे. मुलाचा फोन घेऊन चॅटिंग क्लिअर करून कार्ड तोडून पसार व्हायची. तिला पकडण्यासाठी पोलिसांनीही फेक अकाउंट तयार करून, तिला भेटण्यासाठी बोलवून मग तिला अटक केली.