सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वच जिल्ह्यांत वाढत आहे. अशात आता धार्मिक स्थळे उघडी करण्याची मागणी जोर धरत आहे. यापार्श्वभुमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दारुची दुकाने उघडताय तर मग मंदीरं का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.
साताऱ्यात आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरला भेट दिली. यावेळी साताऱ्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्याच्या सरासरी पेक्षा साताऱ्यात कोरोना वाढीचा दर वाढत आहे. मोठ्या प्रमाणात बेडची कमतरता आहे. बेडची संख्या वाढवण्याची गरज आहे. बेड वाढवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने तात्काळ मंजूर करावा याची मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.
कोरोनाला सरकार गांभीर्याने घेत नाही या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, की मी सरकारवर आरोप करणार नाही. सगळ्या राज्यांनी धार्मिक स्थळे उघडी केली. महाराष्ट्रात काही वेगळी परिस्थिती नाही. देशापेक्षा महाराष्ट्र वेगळा आहे का..? राज्यात दारूची दुकाने, मॉल उघतात तर धार्मिक स्थळे का नाही उघडत असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अलमट्टी बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मुश्रीफांचा माझ्यावर फार विश्वास आहे. त्यांच्याकडून जे होत नाही तर माझ्याकडून होईल असा त्यांना विश्वास आहे. कर्नाटक येथील छ.शिवाजी महाराजांचा पुतळा काँग्रेसच्या आमदाराने अडवला तो त्यांनी तो लावू दिला नाही. सहकारी पक्ष्याला पण सांगायला सांगा..महाराजांच्या पुतळ्यासाठी कर्नाटकात जाऊन आंदोलन करेन. उगीच राजकारण का करायचा असा टोला त्यांनी हसन मुश्रीफांना लगावला. अलमट्टी धरणाची उंची आता वाढू शकत नाही. अलमट्टीची आताची उंची महाराष्ट्राला मान्य नाही. आमच्या राज्यकर्त्यांनी आक्षेप न घेतल्याने आता उंची वाढवण्याचा प्रश्नच येत नाही असे देवेंद्र फडणवीस साताऱ्यात बोलताना म्हणाले.