हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने आज आपले मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर केले. दोन्ही बाजूनी एकूण १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानुसार आज प्रत्येकाला वेगवेगळी खाती देण्यात आली आहेत. खातेवाटपावर एकूण नजर फिरवली तर या संपूर्ण मंत्रिमंडळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्मा दिसत आहे. माविआ सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली महत्त्वाची खाती फडणवीसांनी स्वतःकडे ठेवली आहेत.
महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊन काँग्रेस- राष्ट्रवादीने महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली होती. त्यातही खासकरून राष्ट्रवादीने गृहखाते, अर्थखाते, ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण हि महत्त्वाची आपल्याकडे ठेवली होती. त्याच पद्धतीने भाजपनेही एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री पद देतानाच ग्रामीण भागाशी आणि जनतेशी थेट संबंध असणारी महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवत मोठी राजकीय खेळी खेळली आहे.
त्यातही देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे अर्थखाते, दिलीप वळसे पाटील यांच्याकडील गृहखाते, जयंत पाटील यांचे जलसंपदा खाते आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडील गृहनिर्माण खाते स्वतःकडेच ठेवत विरोधकांना एकप्रकारे इशारा दिला आहे. या खात्याच्या माध्यमांतून जनतेशी संवाद साधण सोप्प जात कारण जनतेशी नाळ जोडणारी ही खाती आहेत याची जाण फडणवीसांना नक्कीच असणार. या खात्यांच्या माध्यमातून लोकांच्या हिताचे निर्णय राबवतानाच पक्षविस्ताराचं धोरणही डोळ्यासमोर असते आणि हीच खेळी फडणवीसांनी खेळली आहे.