बुलडाणा प्रतिनिधी । बुलडाणा जिल्ह्यातील भाजपा-सेना युती मधील चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस हे रविवारी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. नांदुरा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. शरद पवारांची अवस्था सध्या शोले चित्रपटातल्या जेलरसारखी झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. “यंदाच्या निवडणुकीत कुणी प्रतिस्पर्धीच नसल्यानं निवडणुकीला मजा येत नाही. एकीकडे राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, तर शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ अशी झाली असून त्यांच्यासोबत आता कुणीच नाही असंही फडणवीस पुढे म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध करतानाच हार मानली आहे. सत्तेवर येणार नसल्याचे विरोधकांनी आधीच मान्य केले आहे. त्यामुळे त्यांनी काहीही आश्वासने दिली आहेत. आता आम्हाला निवडून द्या, प्रत्येकाला ताजमहल बांधून देऊ एवढंच विरोधकांनी म्हणायचं शिल्लक राहिलं आहे अशी शेलकी टीकाही त्यांनी यावेळी केली.
या भारतात प्रत्येकाच्या मनात शल्य होतं की काश्मीर आमचं होतं पण त्याला वेगळा दर्जा होता. त्याला तिरंग्यापेक्षा वेगळ्या झेंडाला मान होता. त्या ठिकाणी ३७० मुळे काश्मीरमधला व्यक्ती म्हणायचा आम्ही वेगळे आहोत आम्ही भारतीय नाही. त्याठिकाणी वेगळेपणाची भावना तयार झाली होती. पाकिस्तान काश्मीर तोडण्याचा प्रयत्न करीत होता मात्र, मोदींना तुम्ही तीनशेच्या वर जागा दिल्या आणि त्यांनी ३७० कलम रद्द करुन टाकलं आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग झाला. मोदींनी हे करुन दाखवलं, त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात शक्तीशाली भारत तयार होत आहे. मोदींच्या नेतृत्वात एक शक्तीशाली आणि समृद्ध महाराष्ट्र आपल्याला करायचा असल्याचा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.
पंधरा वर्षांत ज्या राज्यातला शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला होता, अशा महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिलो. पंधरा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकऱ्यांना २० हजार कोटीची मदत केली. मात्र, पाच वर्षात युतीच्या सरकारने केलेली मदत ही ५० हजार कोटींची होती. आम्ही राज्यात ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ती अजूनही सुरुच आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात शेतकऱ्याला वर्षाला बाराशे कोटी रुपये दिले जात होते. आम्ही १० हजार कोटी रुपये दिले. जलयुक्तशिवार योजनेतून जवळजवळ १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना शेततळी दिली, दीड लाख शेतकऱ्यांना विहीरी दिल्या असंही फडणवीस यावेळी म्हणाले.