फडणवीसांनीही शेअर केले ठाकरेंचे ‘ते’ व्हिडिओ; म्हणाले, काहींना जनाचीही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा येथील शेतकरी संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वीजबिला बाबतची जुनी ऑडिओ क्लिप दाखवत देवेंद्र, जनाची नाहीतर मनाची तरी दाखवा असा टोला लगावला होता. त्यानंतर फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ शेअर करत काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही असं म्हणत पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे ते मुख्यमंत्री असतानाची शेतकरी कर्जमाफी बद्दल भूमिका मांडलीय आणि विरोधी पक्षात असतानाच्या भूमिकेबाबत ट्विट शेअर केले. काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही…! 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय्.. असं फडणवीसांनी म्हंटल आहे.

यानंतर फडणवीसांनी आणखी एक ट्विट करत महावितरणला विजबिल वसुली थांबविण्याचा आदेश पोस्ट केला आहे. जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही… महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे… शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते-

उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा येथील शेतकरी संवाद मेळाव्यात फडणवीसांवर हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची वीजबिला बाबतची जुनी ऑडिओ क्लिप दाखवत देवेंद्र जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा अशी टीका केली. मध्यप्रदेश सरकारने ६५०० कोटी देऊन बिजबिले स्वतः भरत शेतकऱ्यांची वीजबिले माफ केली आहेत. महाराष्ट्रात मात्र रोज सावकारी पद्धतीने वीजबिले वसूल केली जात आहेत. महाराष्ट्र सरकारनेही मध्यप्रदेश प्रमाणे शेतकऱ्याची वीजबिले माफ करावी अशी मागणी फडणवीसांनी ते विरोधी पक्षनेते असताना केली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खुलं आव्हान देत हिंमत असेल आता वीज बिल माफ करून दाखवा. आता होऊनच जाऊ द्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीजबिले माफ करा अशी मागणी केली.