हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. शिवाय आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला एक सल्ला दिला आहे. मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने वेळकाढूपणा न करता न्यायमूर्ती भोसले समितीच्या अहवालानुसार तातडीने कार्यवाही करावी.”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
फडणवीस म्हणाले, आपण जर जस्टिस भोसले यांच्या कमिटीने दिलेला निर्णय बघितला तर त्यात हे स्पष्टपणे दिलं आहे की, पुनर्विचार याचिकेला आपल्या मर्यादा असतात. त्यांनी स्वत: अनेक अभ्यास आणि संदर्भ देऊन हे सांगितलं आहे की, पुन्हा एकदा मागासवर्गीय आयोगाकडे कशाप्रकारे पाठवलं पाहिजे आणि मागच्या निर्णयात काय त्रुटी आहेत, हे सगळं त्यांनी तयार करुन दिलं आहे. मात्र, सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे.
राज्य सरकारने वेळकाढू धोरण न अवलंबता न्या. भोसले यांच्या समितीने सांगितल्याप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत तत्काळ पुढील कारवाई करावी!
नागपूर येथे माध्यमांशी साधलेला संवाद…https://t.co/PqTSWIwJs8 pic.twitter.com/KCygV9INV1— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 1, 2021
हा मार्ग लांबचा आहे शॉर्टकट नाही, याची मला देखील कल्पना आहे. मात्र, आपण योग्य निर्णय जर घेतलाच नाही तर हा कार्यकाळ आणखी १० वर्षे चालेल. हे लक्षात घेऊन न्यायमूर्ती भोसले समितीने जे सांगितले आहे त्या प्रमाणे त्यावर कारवाई करावी अशी आमची सरकारडून अपेक्षा आहे, असेही फडणवीस शेवटी म्हणाले.