हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी जाहीर केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यांतील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य तसेच, महाराष्ट्रामध्ये सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कामगिरीसाठी जपानने त्यांना ही पदवी प्रदान केली आहे.
देवेंद्र फडणवीसांचा जपान दौरा
जपानकडून मिळालेल्या या पदवीनंतर देवेंद्र फडणवीस डॉ. देवेंद्र फडणवीस म्हणून ओळखले जाणार आहेत. कोयासन विद्यापीठाचे अधिष्ठाता सोएदा सॅन यांनी फडणवीस यांना डॉक्टरेट पदवी देण्याची घोषणा केली आहे. आगामी भारत भेटीमध्ये फडणवीस यांना ही उपाधी देण्यात येईल. सध्या गेल्या चार-पाच दिवसांपासून फडणवीस जपानच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी टोकियोतील इंडिया हाऊसमध्ये विविध मान्यवरांशी चर्चा केली. तसेच, या चर्चेत त्यांनी जपान मधील मराठी विद्यार्थ्यांना जास्त शैक्षणिक सुविधा कशा पुरवल्या जातील, जपान मराठी उद्योगाच्या कांसाठी विकासाची पावले कशी उचलेल अशा मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डॉक्टरेट पदवी जाहीर
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईतील डी. वाय. पाटील विद्यापाठाने डी. लिट पदवी जाहीर केली आहे. राजकीय कारर्दितीत सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे शिंदे यांना ही पदवी देण्यात आली आहे. गेल्या २८ मार्चलाच मुख्यमंत्र्यांना ही डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एकाच वेळी डॉक्टरेट पदवी मिळाल्यामुळे हा योग जुळून आल्याचे म्हटले जात आहे.