Monday, January 30, 2023

MPSC ला स्वायत्तता दिली म्हणजे स्वैराचार नव्हे; फडणवीसांची सरकारवर टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करु द्यायला हवं. परीक्षा पास झाल्यानंतर दोन दोन वर्षे मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नाही म्हणून झालेल्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे, असे फडणवीस यांनी म्हंटल.

फडणवीस म्हणाले, एमपीएसीची एकूणच जी कार्यप्रणाली आहे, याचं पुनरावलोकन होण्याची आवश्यकता आहे. ज्या प्रकारे त्या ठिकाणी वेळ लागतो, मुलाखती होत नाहीत. आज तिथल्या अनेक जागा देखील रिक्त आहेत. एमपीएससीचे मेंबर्स देखील आपण भरलेले नाहीत. मला असं वाटतं हे योग्य नाही. अनेक तरुण यामुळे भरडले जात आहे. एमपीएससीला स्वातंत्र्य हवंच पण स्वैराचार नको, अशा कडक शब्दात फडणवीस यांनी खडेबोल सुनावले.

- Advertisement -

स्वप्नीलचा आत्महत्या म्हणजे ठाकरे सरकारने केलेला मर्डर- राणे

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी या घटनेनंतर सरकारवर गंभीर आरोप केला आहे. निलेश राणे ट्विट करत  म्हणाले की, ‘ठाकरे सरकारने केलेली ही मर्डर आहे. हे सरकार स्वतःच्या मस्तीत असल्यामुळे त्यांचे महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष नाही. एमपीएससी हा विषय इतक्या वेळा ऐरणीवर येऊन सुद्धा राज्य सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.