हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल एक महिना झाला तरीही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा प्रश्न सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला जात आहे. अशात काल दोघांच्या दिल्लीवारीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होणार असे वाटत होते. मात्र, आज फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलं आहे. “आम्ही येत्या 15 ऑगस्टच्या आत नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार करू,” असं फडणवीस यांनी म्हंटले आहे.
देवेंद्र फडणवीस हे ओबीसी अधिवेशनासाठी दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले की, अजितदादांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जे विचारत आहेत. कारण ते विरोधी पक्षनेते आहेत. पण ते विसरतात त्यांचं पाचच जणांचं मंत्रिमंडळ 30-32 दिवस होतं. पण आम्ही मात्र, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीच संबंध नाही. कोर्टाने मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका, असे काही निर्देश दिलेले नाहीत, असे फडणवीस यांनी म्हंटले.
यावेळी फडणवीसांनी ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मला वाटतं की ओबीसी समाज मोठा समाज आहे. देशाच्या मुख्यप्रवाहात त्यांना आणण्यासाठी मोदी सरकारने प्रयत्न केला आणि आम्ही महाराष्ट्रात प्रयत्न केला. नोकऱ्यात आणि शिक्षणात जास्तीत जास्त लोकांना सामावून घेतलं पाहिजे. देशाच्या इतिहासात सर्वाधिक ओबीसी मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेण्याचा विक्रम मोदींनी केला. त्यांच्या नेतृत्वात निश्चित ओबीसींच्या कल्याणासाठी आम्ही काम करू, असे फडणवीस यांनी म्हंटले.