हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वीज बिलाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील शेतकरी संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्याला फडणवीसांनी उत्तर दिले आहे. “यापूर्वी मोठी भाषणं करायचे आणि बोलायचे. तेव्हा सत्तेत नव्हते किंवा मुख्यमंत्री, मंत्री नव्हते. तेव्हा कोणीही विचारायचं नाही. आता लोक विचारत आहेत की, काय केलं ते दाखवा. पण स्वत: काही करायचं नाही आणि बाहेर पडल्यावर प्रश्न विचारायचे यालाही एक वेगळी हिंमत लागते”, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.
मुंबईत मंत्रालयात महात्मा फुलेंच्या तैलचित्राचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “वीज बिल माफ करु असं मी कधीच म्हटलं नव्हतं. मध्यप्रदेश सरकारने कोरोना काळापुरते वीज बिल स्थगित आणि माफ केले होते. त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रातही त्याची अंलबजावणी व्हावी, असे मी म्हणालो होतो.
तेव्हा महाविकास आघाडी सरकार इतके निर्दयी सरकार होते की शेतकऱ्यांना एका नव्या पैशाची सूट त्यांनी दिली नाही. यांना बोलण्याचा अधिकारच नाही. यांनी कनेक्शन कट केले होते. हे कोणत्या तोंडाने बोलत आहेत. आम्ही जे बोलतो ते करतो. हे सत्तेत नसतात तेव्हा वीमा कंपन्यांवर मोर्चा काढतात, काचा फोडतात. आज हिशोब काढला तर यांच्या सत्तेत वीमा कंपनीला सर्वात जास्त फायदा झाला आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
बुलढाण्यातील शेतकरी संवाद मेळाव्याच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. यामध्ये त्यांनी वीज बिल माफ करण्याचा मुद्दा मांडला होता. “सावकारी पद्धतीने वीज बिल वसूल केले जात आहे. काय बोलत होते? मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.