हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. पवारांच्या पुस्तकातील हाच धागा पकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आज पुणे येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली.
पवारांच्या पुस्तकातील खालील वाक्यांचे फडणवीसांकडून वाचन
१) हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यातील सहजता उद्धव ठाकरे यांच्यासोबत नव्हती
२) उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तमबातमी नसे जी मुख्यमंत्र्यांकडे असायला हवी होती.
३) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यानंतर शिवसेनेत उद्रेक होईल याची आम्हाला कल्पनाच आली नव्हती
४) त्यांचे कुठे काय घडत आहे याकडे लक्ष्य नसे, उद्या काय घडेल याचा अंदाज घेण्याची क्षमता असायला हवी ती नव्हती
५) त्यानुसार काय पाऊले उचलायची यासाठी जे राजकीय चातुर्य हवं होत ते उद्धव ठाकरेंकडे नव्हतं त्याची कमतरता आम्हला जाणवली
६) त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होते. तरी हे टाळता येणे त्यांना जमलं नाही.
७) महाविकास आघाडी सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्प्यात उद्धव ठाकरेंनी माघार घेतली
८) उद्धव ठाकरे हे ऑनलाईन पद्धतीने प्रशासनाच्या संपर्कात होते, तर अजित पवार आणि राजेश टोपे आणि इतर मंत्री प्रत्यक्षात लोकांच्या संपर्कात होते
९) उद्धव ठाकरे यांचे फक्त २ वेळा मंत्रालयात जाणे हे आमच्या पचनी पडणारे नव्हते. असं म्हणत फडणवीस यांनी पवारांच्या पुस्तकावरून ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच जेव्हा उद्धव ठाकरेंबद्दल याच गोष्टी आम्ही सांगत होतो तेव्हा मात्र आम्हालाच महाराष्ट्र द्रोही ठरवण्यात आलं. पण आता वज्रमुठीच्या प्रमुखाने वज्रमुठीच्या चेहऱ्याबाबत असं लिहिल्याने मी पवार साहेबांचे आभार मानतो असा असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांनी आठ मागण्या केल्या होत्या? त्यापैकी कोणती मागणी मान्य झाली? असा सवाल करत उद्धवजी तुमचा पोपट मेलाय अशा शब्दात फडणवीसांनी कोर्टाच्या निर्णयावरून हल्लाबोल केला आहे. तसेच आपलं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेन आणि नंतरही आपणच जिंकून येऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.