कृषी कायद्याबाबत फडणवीसांनी दाखवले शरद पवारांकडे बोट ; म्हणाले की, ते कृषिमंत्री असताना….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. शेतकरी आंदोलनावर देखील आता राजकारण होऊ लागलं असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या कायद्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे बोट दाखवले आहे. मोदी सरकारच्या कायद्यांची बीजे शरद पवार कृषीमंत्री असतानाच रोवली गेल्याचे सांगण्याचाही एकप्रकारे फडणवीस यांनी प्रयत्न केला

‘शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या आधारावरच आताच्या केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे केलेले आहेत. त्यामुळेच शरद पवार हे आज द्विधा मनस्थितीत आहेत. कायद्यांचे समर्थन करावे की त्याला विरोध करावा, असा प्रश्न पवारांना पडला आहे’, असे विधान आज फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

फडणवीस म्हणाले कि पंजाब आणि हरयाणा वगळता अन्य कोणत्याही राज्यात या कायद्यांविरुद्ध आंदोलन झालेले नाही. महाराष्ट्रात काँग्रेसने आंदोलन केले मात्र त्यात नेत्यांनी ट्रॅक्टर चालवण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. काँग्रेसच्या या आंदोलनाला शेतकऱ्यांचा अजिबात प्रतिसाद नव्हता, असेही फडणवीस म्हणाले. खरंतर विरोधकांनी हे कृषी कायदे समजून घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यांना तसे करायचे नाही. त्यातून काही जण झोपेचे सोंग घेऊन शेतकरी हिताच्या कायद्यांना विरोध करत आहेत. स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट 

दरम्यान, सरकारने अजूनही शहाणपणाची भूमिका घेतली नाही तर शेतकरी आंदोलन दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही असा इशारा शरद पवारांनी केंद्र सरकारला दिला होता. तसेच शरद पवार हे स्वतः यासंदर्भात राष्ट्रपतींशी चर्चा करणार आहेत. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’