धक्कादायक ! सिगारेट ओढण्यास मनाई केल्यामुळे संतप्त भाडेकरूने केली घरमालकाची हत्या

Dhule Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये धुळे शहरातील राजहंस कॉलनीत राहणाऱ्या रमेश श्रीराव या निवृत्त बँक कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. हि हत्या श्रीराव यांच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूच्या मुलानेच केली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलिसांनी अजिंक्य मेमाणे याला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण
धुळे शहरातील मिल परिसरातील राजहंस कॉलनीत राहणारे मृत रमेश हिलाल श्रीराव हे बँकेचे निवृत्त कर्मचारी होते. एप्रिल महिन्यात ते सेवेतून निवृत्त झाले होते. ते सध्या राजहंस कॉलनीत स्थायिक झाले असून त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आपले घर विश्वनाथ मेमाने यांना भाडेतत्वावर दिले होते. या ठिकाणी मेमाने हे त्यांची पत्नी व २ मुलांसह राहत होते. मेमाने यांचा मोठा मुलगा अजिंक्य हा कोपरगाव या ठिकाणी बीसीएचे शिक्षण घेत आहे. तर लहान मुलगा मुक्ताईनगर येथे शिक्षण घेत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अजिंक्य तीन-चार महिन्यांपासून येथे घरीच होता. विशेष म्हणजे तो घरमालक श्रीराव यांच्यासोबत रोज पहाटे मॉर्निंग वॉकला जात असे. विश्वनाथ मेमाने हे घरात असताना सिगारेट ओढत असत. त्यामुळे घरमालक श्रीराव हे मेमाने कुटुंबाला सिगारेट ओढणे, उशिरा उठणे यावरून सतत बोलत असत.

मेमाने यांचा मुलगा अजिंक्य याचे नेहमी श्रीराव यांच्याकडे येणे जाणे होते. घरमालक श्रीराव हे मेमाने कुटुंबाला नेहमी उलट सुलट बोलत असतं. त्यात सिगरेट पिण्यास रागवल्याने त्या रागातून अजिंक्यने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मेमाने यांचा मुलगा अजिंक्य हा त्याचा राग मनात धरुन सकाळी श्रीराव यांच्या घरी गेला. त्यावेळी रमेश श्रीराव हे घराच्या गच्चीवर योगासने करत होते. त्या वेळेस अजिंक्य याने त्यांच्या डोक्यात लोखंडी फावड्याने वार केला. यामध्ये रमेश श्रीराव यांचा जागीच मृत्यू झाला. हि हत्या करून अजिंक्यने गच्चीवरून खाली येऊन त्यांच्या पत्नीचा देखील गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. या वेळी अजिंक्य आणि रमेश श्रीराव यांच्या पत्नीमध्ये झटापट झाल्याने त्या त्याच्या तावडीतून सुटल्या आणि घराच्या गॅलरीत जावून त्यांनी आरडा ओरड केली.महिलेचा आवाज ऐकून परिसरातील नागरीकांनी रमेश श्रीराव यांच्या घराकडे धाव घेतली आणि त्यांनी आरोपी अजिंक्यस पकडले. यानंतर धुळे शहर पोलिसांनी अजिंक्यला ताब्यात घेऊन त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.