हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अदानी ग्रुपचे चेअरमन आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात भरपूर वाढ झाली आहे. विरोधकांनी यावरून अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधावर निशाणा साधला होता. त्याच दरम्यान तुम्हाला खरच मोदींमुळे फायदा झाला का ? असा सवाल एका इंटरव्हिव्ह मध्ये अदानी यांना केला असता त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर देत विरोधकांचे तोंड बंद केलं आहे.
इंडिया टुडे ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत अदानींना विचारण्यात आले की, तुमचे अतुलनीय यश मोदींमुळेच आहे, असे म्हणणाऱ्या टीकाकारांबद्दल त्यांना काय म्हणायचे आहे, यावर बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी एकाच राज्यातून आलो, त्यामुळे माझ्यावर असे बिनबुडाचे आरोप करणे विरोधकांना सोप्प जाते. परंतु यात तथ्य नाही. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना माझा प्रवास सुरू झाला. त्यांनी एक्झिम पॉलिसीला चालना दिली आणि त्यातूनच माझे एक्स्पोर्ट हाऊस सुरू झाले. राजीव गांधींशिवाय माझा उद्योजक म्हणून प्रवास कधीच सुरू झाला नसता असे त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांनतर 1991 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणा लागू केल्या तेव्हा त्यांना दुसरी संधी मिळाली. अदानी पुढे म्हणाले, माझ्यासाठी तिसरा टर्निंग पॉइंट हा 1995 साली आला. जेव्हा केशुभाई पटेल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी मुंद्रा येथे पहिले बंदर बांधले. चौथा टर्निंग पॉइंट हा 2001 साली आला, जेव्हा गुजरातने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासावर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रीत केले. मोदींच्या धोरणांमुळे गुजरातमधील अविकसित भागांचाही विकास झाला. त्यामुळे उद्योग आणि रोजगाराचा विकास होऊन आर्थिक बदल घडून आले असं म्हणत अदानी यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.