हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन गृहमंत्री कोण अशा चर्चा रंगल्या होत्या. जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, हसन मुश्रीफ असे अनेक मातब्बर नेते असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनुभवी दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्रीपद दिले. वळसे पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात.
दिलीप वळसे सध्या राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वीय सहाय्यक पदापासून तर अनेक कॅबिनेट मंत्रिपदांपर्यंत जबाबदाऱ्या पार पाडल्यात. त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. हेच वळसे पाटील आता राज्याचे गृहमंत्री असणार आहेत. गृहविभागाचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या निमित्ताने त्यांच्या राजकीय आलेखाचा हा आढावा.
दिलीप वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 रोजी झाला. 1990 साली आंबेगाव तालुक्यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला.
दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे.
दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा आमदार झाले आहेत. 2009 ते 2014 या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.