महाविकास आघाडीकडून निराशा, 5 तारखेला कठोर निर्णय घेणार- राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार कडून निराशा झाली असून येत्या 5 तारखेला होणाऱ्या बैठकीत आपण कठोर निर्णय घेणार आहोत असे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं. सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर अशी सत्ता नकोच आहे अशी भूमिका त्यांनी मांडली.

राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. येत्या 5 तारखेच्या बैठकीत कठोर निर्णय घेतला जाईल, मी आमदारकीच्या आशेवर बसलो नाही, मला आमदारकी नाही मिळाली तरी फरक पडत नाही असं राजू शेट्टी म्हणाले.

दरम्यान ,भाजपच्या काळातील सगळ्याच योजना नावं ठेवण्यासारख्या नव्हत्या असे राजू शेट्टी यानी म्हणल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या. शेट्टी यांच्या या विधानामुळे आता ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु त्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना ५ तारखेच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेणार यावर पुढचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

Leave a Comment