नागपूर प्रतिनिधी | भाजप अजिंक्य असल्याच्या सध्या अविर्भावात आहे. त्यांच्या या आत्मविश्वासाला भुलून विरोधी पक्षातील भल्याभल्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून भाजपमध्ये प्रवेश केला.परंतू असे असले तरी विदर्भातील भाजप नेत्यांना याचीच धास्ती बसलेली दिसत आहे. विदर्भात भाजपमधील इच्छूकांची गर्दी पाहता, उमेदवारीची खात्री नसल्याने ऐनवेळी निराशा नको म्हणून भाजपच्या काही नेत्यांनी अन्य पक्षांकडे गळ टाकून ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपचे हिंगण्याचे (जि. नागपूर) माजी आमदार विजय घोडमारे यांनी अलीकडेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय पूर्व विदर्भातील शिवसेनेचे एक माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. युतीचे जागावाटप निश्चित झाल्यावर ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूर शहारातील सर्व सहा विधानसभा जागांसाठी पक्षाने मुलाखती घेतल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (दक्षिण पश्चिम) आणि कृष्णा खोपडे (पूर्व) यांच्या मतदारसंघाचा अपवाद केला, तर इतर ठिकाणी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पक्षाचीही चिंता वाढली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत उत्तरमध्ये पक्षाला काँग्रेसच्या तुलनेत कमी मते मिळणे, मध्य आणि दक्षिण या मतदारसंघातही अपेक्षित मत्ताधिक्य न मिळणे यामुळे येथे नवीन चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते, असे संकेत पक्षातीलच वरिष्ठांनी दिल्याने विद्यमान आमदार धास्तावले आहेत.
उत्तर नागपूरमध्ये काही नेते वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात आहेत. तर याविषयी सांगताना भाजपचे विद्यमान आमदार डॉ. मिलिंद माने म्हणाले, भाजपचा कुठलाही नेता वंचितच्या संपर्कात नाही. डॉ. मिलिंद माने पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने त्यांनी तयारीही सुरू केली आहे. अशा सर्व वादळात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे पक्ष निष्ठा म्हणजे काय हे कार्यकर्त्यांना शिकवण्यासाठी राजकीय पक्षांना इथून पुढे वर्गच भरवावे लागतील असे चित्र एकंदर राजकीय पटलावर आहे.




